top of page

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेणार? कोरोनासारखं संकट, सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Mar 26
1 min read

नवी दिल्ली: मध्य-पूर्वेत वाढत असलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार असून, देशाच्या सुरक्षेसह आर्थिक आणि सामाजिक परिणामांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.

मध्य-पूर्वेतील संघार्षामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता वाढली आहे. तेलाच्या किमतीत होणारे चढ-उतार, व्यापार साखळीतील अडथळे, तसेच भारतीय नागरिकांची सुरक्षितता या महत्वाच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताच्या मध्य पूर्वेतील देशांशी घनिष्ठ आर्थिक आणि उर्जा संबंध असल्याने या तणावाचे थेट परिणाम देशावर होऊ शकतो, याची जाणीव केंद्र सरकारला आहे.


दरम्यान, पंतप्रधान मोदी या बैठकीमध्ये प्रत्येक राज्याची आपत्कालीन परिस्थितीसाठीची तयारी, आवश्यक संसाधनांची उपलब्धता, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात येणार्‍या उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. विशेष: मोठ्या शहरांमधील सुरक्षा यंत्रणा, अरोग्य सेवा, अन्न आणि इंधन पुरवठा यासारख्या महत्वाच्या बाबींवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.


याबैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे देखील ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रासारख्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या राज्यासाठी अशा जागतिक घडामोडींचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारकडून आवश्यक ती तयारी आणि उपाययोजना याबाबत केंद्राशी समन्वय साधला जाणार आहे.

मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सज्ज राहणे आणि कोणत्याही संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी एकसंध धोरण आखणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.


लोकसभेत मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा लोकसभेत उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, हे संकट कोरोनासारखेच गंभीर असू शकते. त्यामुळे सर्व देशवासियांनी खंबीर राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात केले होते.

Comments


bottom of page