top of page

मविआकडून शरद पवारच राज्यसभेचे उमेदवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा

मुुंबई: उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वत: शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवास्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यात आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्विट करून महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावास पाठिंबा असल्याचे सुचवले आहे. त्यामुळे शरद पवार हेच महाविकास आघडीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.


राज्यसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या उद्या शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीकडून कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ कमी असतानाही ज्येष्ठ नेते म्हणून दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या नावाची घोषणा केली, तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे आणि उद्धव ठाकरेंसह शिवसेना पक्षाचे आभार मानले आहेत.


अधिकारी सिल्व्हर ओकवर जाणार : दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सभागृहात येणार नाहीत. त्यामुळे, उद्या कदाचित विधिमंडळातील अधिकारी शरद पवार यांना सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन उमेदवार अर्ज भरतानाची गोपनियेतीची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती आहे.


भाजपकडून चार नावे जाहीर : राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी एकच दिवस उरला असून सर्वच राजकीय पक्षांकडून नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील 4 जागांसाठी 4 नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे नेते विनोद तावडे, रिपाइंचे रामदास आठवले यांच्यासह नागपूरच्या नगरसेवक माया ईवनाते आणि हिंगोलीचे रामराव वडकुतेंना भाजपने संधी दिली आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडूनही कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान, मविआकडून तिन्ही पक्षांमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू असताना शरद पवारांचं नाव जवळपास आज जाहीर करण्यात आल्याने शरद पवार पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Comments


bottom of page