दुष्काळाची भीषणता: वन्यजीवांचा जगण्याचा संघर्ष, मृत्यूच्या दाढेत..!

घोटभर पाण्याच्या शोधात विहीरीत पडलेल्या कोल्ह्यास जीवदान, सर्पराज्ञी वनविभागाचे परिश्रम

दुष्काळाची भीषणता: वन्यजीवांचा जगण्याचा संघर्ष, मृत्यूच्या दाढेत..!
Published By: Navnath Yeole
Published On:

बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने वन्यजीवांच्या नैसर्गिक पाणवठ्यांचे स्रोत आटू लागले आहेत. परिणामी, घोटभर पाण्याच्या शोधात वन्यजीवांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. याचाच प्रत्यय शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे आला. पाण्याच्या शोधात भटकणारा एक कोल्हा शेतकऱ्याच्या विहिरीत पडल्याची घटना घडली.

मानूर येथील शेतकरी अंबादास अश्रुबा कदम यांच्या विहिरीत हा कोल्हा पडला होता. या घटनेची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते पठाण यांनी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राला दिली. सर्पराज्ञीचे संचालक तथा मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे यांनी तातडीने वन विभागाला याबाबत कळविले.

विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पराज्ञी व वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे, वनपाल अजय देवगुडे, वनरक्षक संदीप राठोड, सोपान येवले, सतीश गरजे, रोहित पुरी आणि भीमराव सवासे यांनी अथक प्रयत्न करून विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे या वन्यजीवाला जीवदान मिळाले.

नागरिकांनी वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करावी : "दुष्काळाच्या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडत असल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे आणि शेतशिवारात येत आहेत. अशा वेळी विहिरी, शेततळी आणि उघड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये पडून वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होतो. नागरिकांनी आपल्या शेतात, घराजवळ तसेच परिसरातील सुरक्षित ठिकाणी वन्यजीवांसाठी स्वच्छ पाण्याची भांडी किंवा पाणवठे ठेवावेत. विहिरींना संरक्षक कठडे किंवा सुरक्षित जाळ्या बसवाव्यात. उन्हाळ्यातील आणि दुष्काळातील घोटभर पाणी एखाद्या वन्यजीवाचे प्राण वाचवू शकते. वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे."
-सिद्धार्थ सोनवणे 
(मानद वन्यजीव रक्षक,बीड)

Related Posts