उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला: अजिदादांच्या दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवारांची कृती बघून सगळेच भावूक ; पार्थ पवारांच्या डोळ्यांत अश्रू तरळले

मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज दि. 10 फेब्रूवारी 2026 रोजी मंत्रालयात अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्याने आजचा दिवस राज्याच्या राजकारणात अत्यंत ऐतिहासिक आणि तेवढाच भावूक ठरला आहे.
31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांनी अधिकृतपणे कामाची जबाबदारी घेतली. पदीार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सकाळी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
त्यानंतर सुनेत्रा पवार या विधानभवन परिसरात आल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुनेत्रा पवार या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाल्या. दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवार यांनी प्रथम खुर्चीला आणि त्यानंतर टेबलला हात जोडून नमस्कार केला. अजितदादांच्या प्रतिमेला हात जोडून नमन केलं. आपल्या पतीच्या रिक्त झालेल्या जागेवर (उपमुख्यमंत्री पदावर) कार्यभार स्वीकारताना सुनेत्रा पवार काहीशा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
हे दृश्य पाहून त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले. आईला वडिलांच्या जागेवर पाहून पार्थ पवार यांना रडू कोसळल्याने उपस्थित राष्ट्रवादीच्या आमदार, मंत्री व पदाधिकार्यांमध्ये काही काळ शांतता पसरली होती. सगळेजण भावूक झाले होते. दरम्यान, पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या त्यांच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहील्या. सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच कॅबिनेट बैठक असणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून आहे.



Comments