top of page

बारामती पोटनिवडणुक बिनविरोधाची आशा धुसरच ! सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार रिंगणात; आतापर्यंत 17 उमेदवारी अर्ज दाखल

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होईल असा कयास होता, अजितदादांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाबद्दल प्रचंड सहानुभूतीमुळे जवळपास ही पोटनिवडणुक बिनविरोध होणार तसे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने संकेत दिले होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने बारामती पोटनिवडणुकीची बिनविरोधची अशा मावळली आहे.

बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होईल अशी चर्चा तर होती, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही तशा प्रतिक्रिया दिल्या. पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि काँग्रेसनं निवडणुक लढवण्याची घोषणा केल्याने राजकीय समिकरणं बदलली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या अडचणी वाढल्या, बिनविरोध निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी धावाधाव सुरू केल्याची माहिती आहे.


सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. पण ‘आता खूप उशीर झाला, आमची उमेदवार निवडीची प्रोसेस ऑलरेडी सुरू आहे’ असं उत्तर सपकाळ यांच्याकडून देण्यात आले. यामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध होण्याची अशा आता मावळली आहे.


दरम्यान, बारामतीच्या पोटनिवडणुकीचं वातावरण आता चांगलच तापायला लागलं आहे. काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर करत आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आकाश मोरे टक्कर देणार आहेत. स्थानिक पातळीवर जय पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत कोणाचे पारडं जड राहणार हे पाहावे लागणार आहे.


दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आकाश मोरे हे माजी आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य राहिलेले विजयराव मोरे यांचे चिरंजीव आहेत. स्थानिक पातळीवर त्यांचे कुटुंबीय राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याने त्यांना ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे,2014 साली आकाश मोरे यांनी काँग्रेसच्या ‘पंजा’ या चिन्हावर निवडणुक लढवली होती.


सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 17 उमेदवारी अर्ज दाखल:

2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंणात होते. मात्र, दादांच्या निधनानंतर पोटनिवडणुक न लढवण्याची भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीने घेतली. दादांना श्रद्धांजली म्हणून निवडणुक लढवणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलं होतं. तर बारामतीची निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी सुनील तटकरेंकडून देखील प्रयत्न सुरू झाले आहेत. मल्लिकार्जुन खरगेंसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने प्रयत्न फोल ठरल्याचे चित्र आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणुक होणार आहे, या निवडणुकीसाठी आतापर्यंत 17 उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवार उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दूसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता आता जवळपास मावळल्याचे चिन्ह आहेत.

Comments


bottom of page